औरंगाबाद: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गारखेड्यात जोरदार भाषण दिले. शहराच्या गंभीर कचरा प्रश्नाकडे दुर्लक्ष करून मुख्यमंत्र्यांनी पाण्यासाठी निधी पुरविण्याचे आश्वासन यावेळी दिले. शहरी मतदारांना आश्वस्त करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना मात्र ग्रामीण भागाचा सोयीस्कर विसर पडलेला दिसतो. विशेष म्हणजे जिल्ह्यातील तब्बल 14 लाख जनता पाण्यासाठी त्राहिमाम् करीत असताना मुख्यमंत्रांच्या कोरड्या आश्वासनाने मतदारांचा घसा आणखीच कोरडा पडलाय. तीव्र दुष्काळाने औरंगाबाद- जालना जिल्ह्यातील जनतेला जीव नकोसा झाला आहे. खायला काही नाही अन घशात ओतायला पाणीही नाही.औरंगाबाद जिल्ह्यातील चौदा लाख तर जालना जिल्ह्यातील आठ लाखाहून अधिक जनता पाण्यासाठी भटकंती करतेय. अशा परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री शहरातल्या एखाद्या चौकात शहरवासीयांच्या पाण्याचा प्रश्न सोडवू असे आश्वासन देतात. तेव्हा तुम्ही नगरसेवक आहात की राज्याचे मुख्यमंत्री ? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. तब्बल तासभर चाललेल्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणात विकास कामांचा मोठा गवगवा करण्यात आला. त्याच वेळी औरंगाबाद जालना मतदार संघातील तब्बल 23 लाख लोक पाणी पाणी करीत होते हे वास्तव विचार करायला लावणारेच आहे.
या निवडणुकीत पाणीच ठरविणार भवितव्य
या निवडणुकीत पाणीच उमेदवाराचे भवितव्य ठरविणार आहे. पाण्यात देव ठेवून असलेले अनेक जण याच पाण्यात गटांगळ्या खाणार यात शंका नाही. शहर पाण्यासाठी वन वन भटकते ग्रामीण भागात मैलोन् मैल पायपीट करावी लागते याचे चित्र डोळ्यासमोर ठेऊन मतदार जेव्हा ईव्हीएम मशीन समोर येतील तेव्हा कुणाला पाण्यात डुबवतील, हे सांगायला ज्योतिषाची गरज राहिली नाही.
शंभर कोटी गेले कुठे ?
मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षापूर्वी शहरासाठी शंभर कोटी देण्याची घोषणा केली होती. वर्षभर तर या नतद्रष्ट स्थानिक मंडळींनी पैशाची मागणी केली नाही. त्यानंतर सहा महिने कोणते रस्ते हवेत यावर वादावादी केली. दोन वर्ष झाले तरी शंभर कोटींची विकास कामे रेंगाळत पडली आहेत. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही दिलेले पैसे कोणत्या हातात सापडतात याची जरा चौकशी करा म्हणजे सत्य समजेल ! शहराच्या विकासाचा पैसा घेणारी झोळी व तिला पडलेले छिद्र या पैशांची पार वाट लावून टाकतात. सडलेली यंत्रणा आणि इथली सडकी डोकी एकदा दुरुस्त करावीच लागेल.
ग्रामीण जनतेला गृहित धरू नका
ज्या ग्रामीण भागावर युतीची मदार आहे, त्याच ग्रामीण भागातील जनता पाण्यासाठी त्रस्त आहे. मुख्यमंत्री शहरात पाणी पुरवण्याचे आश्वासन जेव्हा देता तेव्हा ग्रामीण जनतेला कोणता संदेश जातो हेही समजायला हवे. ज्या मतदारांच्या भरवश्यावर तुम्ही सत्तेवर येता त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही त्यांना गृहीतच धरत आहात, असेही आता बोलले जात आहे.